Drawing Analysis-Decode Your Subconscious Mind

आपण खूप पूर्वी पासून भावना व्यक्त करण्यासाठी चित्र-कला हे एक साधन वापरत आहोत. माणसाच्या सुरवातीच्या काळात तो दगडांवर, गुहांमध्ये चित्र काढायचा आणि त्यांच्यावर येणाऱ्या परिस्थिती तिथे मांडायचा. त्यांचं आयुष्य आपण गुहांमध्ये पाहू शकतो. जगात अनेक ठिकाणी अश्या गुहा सापडतात. भारतात अजंठा वेरूळ ची लेणी आहेत तसेच इजिप्तच्या गुहांमध्येही काही अवशेष सापडले आहेत. मानसशास्त्रामध्ये पण चित्रांचं विश्लेषण हे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी केले जाते. हस्ताक्षर लेखनामध्ये एखाद्या भाषेत व्यक्त होण्याच्या मर्यादा असतात. चित्रांमध्ये असे मर्यादांचे बांध नसतात. आपल्याला हव्या त्या पद्धतीने व्यक्त होता येते.. चित्र काढणाऱ्याचा स्वभाव समजून घेणे यामुळे सोपे जाते.

मागच्या काही लेखांमधून एकंदर हस्ताक्षरावरून स्वभाव कसा समजून घ्यावा हे कळतेच. आता या लेखात चित्रांवरून स्वभाव समजून घेण्याची कला पाहूया..

New Article : अक्षरे सांगती स्वभाव (Handwriting Size)

 

व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी डोंगर, सूर्य, पाणी, घर, झाड, माणूस आणि साप अश्या चित्रांचे विश्लेषण करता येते. या चित्रांमधून आपली जडण घडण कशी झाली ते समजते कारण ही चित्रं आपल्या आयुष्याची महत्वाची आणि अविभाज्य भाग आहेत. चित्रांमधून भावना, आपल्यावर असलेले प्रभाव आणि आपल्या आवडी समजतात.

तुम्ही कधी हा विचार केला आहे का, आपण बऱ्याचदा चित्रांच्या माध्यमातून विचार करतो. समुद्र म्हणताच क्षणी काही जणांच्या मनात खवळलेला समुद्र तर काही जणांच्या मनासमोर शांत समुद्राचे चित्र येते. समुद्राकाठची झाडी, समुद्रपक्षी, किनारा अशी चित्रं आपल्या डोळ्यासमोर येतात. त्या बरोबर असलेल्या आठवणी येतात, समुद्राशी संबंधित वास आपल्याला जाणवतात, काही जणांना तर समुद्रावरच्या जेवणाची चवही आठवत असेल. एखादा शब्द बऱ्याचदा आपल्या मनात एखादी आठवण, भावना यांच्याशी निगडित असतो. त्याच्याशी संबंधित चित्र आपल्या डोळ्यासमोर येऊन जातात. आपली कल्पना किंवा आपला समज  यावर ही चित्र अवलंबून असतात. 

चित्राचं विश्लेषण करताना कुठल्याही वयाच्या व्यक्तीला ६-७ घटक काढायला सांगितले जातात. या ७ घटकां-व्यतिरिक्त काही काढायचे असल्यास काढू शकता पण हे घटक गरजेचे आहेत. स्वतःच्या मुलांचे किंवा स्वतःच्या चित्राचे विश्लेषण करायचे असेल तर आधी खालील ६ धातक काढून पहा आणि मग विश्लेषण वाचा. तुम्हालाही नवीन काहीतरी समजेल.

१. सूर्य     २. डोंगर     ३. पाणी     4. झाड     ५. घर     ६. माणूस    

या प्रत्येक घटकाच्या चित्रांचे हजारो प्रकार काढता येऊ शकतात. या लेखामध्ये मी काही ठराविक जे जास्त प्रमाणात दिसतात अश्या चित्रांबद्दल माहिती लिहीन.

तुम्हाला काही मूळ गोष्टी समजून घ्याव्या लागतील.

 1. स्त्री – पुरुषांचा आपल्या आयुष्यावर प्रभाव:

लहान असताना आपल्याला आई आणि वडील जे शिकवतात, ते आपलं जग असत. जसे मोठे होत जातो तसं आपण आलेल्या अनुभवामधून शिकतो. हे अनुभव आपल्या subconscious mind मध्ये feminine आणि masculine अनुभव म्हणून साठवले जातात. इथे स्त्री आणि पुरुष हे लिंग महत्वाच नसून भावना महत्वाच्या असतात.

स्त्री उर्जा (feminine aspects/ female energy) म्हणजेच माया, प्रेम, दया, एखाद्याला समजून घेणे, व्यक्त होता येणे, intuition, मृदुता, संगोपन करणे हे feminine traits मानले जातात.

पुरुषांकडून आलेले अनुभव त्यांच्या कडून येणारी उर्जा (masculine energy) म्हणजेच आक्रमकता, आत्मविश्वास, जबाबदारी, logical thinking, जोखीम पत्करणे असे traits masculine मानले जातात.

हे traits समजावून सांगणारे अनुभव घेतल्यावर आपण स्वतःमध्ये या दोन प्रकारचे traits विकसित करतो.

सहसा असे म्हणले जाते कि आईचा प्रभाव हा ०-७ वर्षापर्यंत मुलांवर जास्त असतो आणि त्या नंतर ७-१४ वर्षांमध्ये वडलांचा प्रभाव जास्त असतो. या ०-७ या specific काळात मुलं भावनांवर अवलंबून असतात. समजून घ्यायला ते या काळात शिकतात आणि ७-१४ या वयोगटात मूलं जबाबदारी घ्यायला, जोखीम पत्करायला शिकतात. थोडक्यात feminine आणि masculine energies ते या वायांमध्ये हस्तगत करतात. त्या वेळी जर मुलांना योग्य दिशा मिळाली हे अनुभव मिळाले तर ते एक करारी बनतात.

म्हणून ०-७ या वयात आई चा सहवास सगळ्यात जास्त गरजेचा आणि ७-१४ या वयात वडीलांचा सहवास मुलांना मिळणं जास्त गरजेच असतं.

 1. कागद:

Graphology च्या मुख्य नियमांनुसार कागदावर आपल्याला वेळ, उर्जा, पैसा, ज्ञान आणि अनुभव या साधनांबद्दल कळते.

Past, Present & Future

वेळ/ काळाचे उदाहरण घेता डावीकडे भूतकाळाशी निगडीत घटक पहिले जातात. मध्ये सद्यस्थिती पहिली जाते आणि उजवीकडे आपण भविष्यात येणाऱ्या घटनांना कसे सामोरे जाऊ हे पाहता येते.

कागदावरून अजून काय समजू शकतं याच्या अधिक माहितीसाठी खालील लेख पाहू शकता :

.अक्षरे सांगती स्वभाव (margins, spacing, baseline) 

२. अक्षरे सांगती स्वभाव ( slant) 

३. Know How to Face Challenges from Handwriting (Zones

हे समजून घेतल्यावर आता चित्र समजून घेण्याकडे वळूया.

सूर्य:

सूर्य हा आपल्या आयुष्यात वडिलांशी किंवा वडिलांसामान व्यक्तीशी निगडीत असतो. वडिलांनी मुलासाठी किती कष्ट घेतले आहेत, किती मदत केलीये आणि त्या व्यक्तीला वडलांचा किती आधार वाटतो हे सूर्य काढण्या वरून समजते. सूर्य काढताना subconscious mind मध्ये वडिलांची प्रतिमा असते. आपले subconscious mind सूर्य म्हणजे सामर्थ्य, उत्साह , शक्ती, चैतन्य, कृती, आधार असे प्रतिक मानते. हे सगळे masculine traits वडिलांकडून पुढे मुलांमध्ये जातात म्हणून सूर्य हा वडिलांशी संबंधित आहे. वडील म्हणजे चित्र काढणाऱ्या व्यक्तीचे वडील आणि जर ती व्यक्ती पुरुष असेल तर ती स्वतः वडील म्हणून कशी असेल हे या सूर्य मधून समजते.

सूर्य काढण्याच्या अनेक पद्धती आहेत ज्याचे विश्लेषण केले जाते. त्या विश्लेषणाच्या काही बाबी खाली नमूद करत आहे. १. सूर्याचा आकार, २. त्याची कागदावरची जागा, ३. सूर्याची किरणं: सरळ कणखर आहेत कि थरथरत्या हातानी काढल्यासारखी वाटत आहेत, नागमोडी किरणे, लहानमोठी काढलेली किरणे, त्रिकोणी किरणे, सूर्याला चिटकून- न चिटकता काढलेली किरणे, किरणाच्या आईवजी केलेलं रंगकाम, 4. किरणांचा आकार ,५. किरणाची संख्या, ६. बाकीच्या गोष्टी जसं कि सूर्य मध्ये हसरा चेहरा काढणे, मिशी असलेला चेहरा काढणे, सूर्याचे डोळे कुठे आहेत त्यावरूनही त्याच्या वडिलांचा स्वभाव काही प्रमाणात समजू शकतो. चित्रामध्ये सूर्यास्त असणे अश्या अनेक गोष्टी एक सूर्य मधून पाहता येतात. त्या सर्व इथे समजावणे शक्य नाही म्हणून काही महत्वाचे आणि नेहमी दिसणारे traits इथे समजावून सांगते.

 

सूर्याचा आकार:

वडिलांकडून आधार, सामर्थ्य, कृती करण्याची ताकद, उर्जा हे घटक मुलांना मिळतात. ते आकारावरून आपण पाहू शकतो.

१. पूर्ण सूर्य:

Full Sun

वडिलांनी त्यांच्या क्षमतेप्रमाणे सर्व गरजेच्या गोष्टी व्यक्तीसाठी केल्या आहेत असे त्या व्यक्तीला वाटते. वडिलांचा त्या व्यक्तीला पूर्ण पाठींबा आणि आधार असतो.

२. अर्धा सूर्य:

Half sun

डोंगरातून उगवणारा किंवा मावळणारा सूर्य काही मुलं काढताना दिसतात. त्या मुलाच्या दृष्टीकोनातून वडिलांना शक्य असतानाही, ते मुलाला संभाव्य मदत करण्यात कमी पडले. अशी शक्यता असते कि, असा सूर्य काढणारी मुलं स्वतः वडील झाल्यावर पण हेच करतात. वडिलांनी पूर्ण energy, वेळ, आधार यासारख्या गोष्टी दिल्या नाहीत असे चित्र काढणाऱ्या व्यक्तीला वाटते.

३. सूर्य न काढणे:

अश्या व्यक्तींच्या आयुष्यात वडिलांचा प्रभाव नगण्य असतो. या व्यक्तींना वडिलांचा आधार मिळालेला नसतो. सूर्य न काढण्याच्या त्याच्या पर्यायावरून तो वडिलांचा वेळ हवासा वाटूनही न मिळाल्याच दर्शवतो.

सूर्याची जागा:

१. कागदाकडे पाहताना कागदाच्या डावीकडे सूर्य:

डावीकडे सूर्य

या व्यक्तीसाठी वडिलांची प्रतिमा आधार म्हणून होती. वडिलांनी व्यक्तीच्या भूतकाळात मदत केली आहे.

२. कागदाच्या मध्यभागी सूर्य:

मध्यभागी सूर्य

वडील शक्य ती सगळी मदत मुलाला करत आहेत. वडिलांचे अस्तित्व, आधार, त्यांच्याकडून येणारी उर्जा ही चित्र काढणाऱ्याला सद्य स्थितीमध्ये आहे.

३. कागदाच्या उजवीकडे सूर्य:

उजवीकडे सूर्य

ह्या प्रकारचा सूर्य काढणाऱ्या व्यक्तींच्या वडिलांनी मुलांना येणाऱ्या काळाबद्दल अनेक आश्वासने दिलेली असतात. असं चित्र दाखवत कि वडील येणाऱ्या काळात मुलांसाठी वेळ काढतील किंवा मुलांसाठी आधार बनतील, त्यांना शक्य असणाऱ्या सगळ्या गोष्टी या भविष्यात असतील असे दिसते. मुलाची इच्छा असते वडिलांनी त्याचा भविष्यात आधार बनाव.

सूर्याची किरणे:

सूर्याची किरणे ही चित्र काढणाऱ्या वर वडिलांचा किती प्रभाव आहे याचे प्रतीक मानली जातात.

१. एकसमान किरणे:

एकसमान किरणे

चित्र काढणाऱ्या व्यक्तीसाठी त्याचे वडील खूप प्रभावी होते. वडिलांच्या कृतीची, वागण्या-बोलण्याची परिणामकारकता जास्त होती. वडिलांबद्दलचे आकर्षण, प्रेम भरपूर आहे. एकंदर या व्यक्तीसाठी वडील एक आदर्श आणि प्रभावी व्यक्तिमत्व आहेत.

२. एकसारखी नसलेली किरणे:

एकसमान नसलेली किरणे

या व्यक्तीसाठी वडीलांचा प्रभावीपणा बदलता होता. काही वेळेस वडिलांचे विचार या व्यक्तीला खूप प्रेरणादायी ठरत असतील तर काही वेळेस वडिलांचे आणि या व्यक्तीचे विचार जुळत नसतील. त्यांचा प्रभाव कमी होत असेल.

सूर्याचे इतर विविध पैलू:

१. चेहरा असणारा सूर्य:

हसरा सूर्य

वडिलांना सगळ्या गोष्टींचा आनंद उपभोगायला आवडते. या व्यक्तीचे वडील लोकांशी बोलताना, कुठलही काम करताना, पुस्तकं वाचताना, TV पाहताना, वाद घालताना आनंद शोधत असतील. थोडक्यात आयुष्य जगताना प्रत्येक गोष्टीची मजा घेऊन त्यातून आनंद घेऊन जगत असतील.

२. चष्मा घातलेला सूर्याचा चेहरा:

चष्मा सूर्य

असे चित्र काढणाऱ्या व्यक्तीचे वडिलांबद्दल वेगळे मत असते. या व्यक्तीच्या वडीलांना सत्य परिस्थिती च्या पलीकडे जाऊन पहाणे जड जात असेल.

 

डोंगर:

डोंगर हे, व्यक्ती तिच्या आयुष्यातल्या अडचणींना कशी सामोरी जाईल, या क्षमतेचे रेखाटन करतात.

वडिलांनी लहानपणी (७-१४ वर्षाच्या काळात) मुलांच्या मनात मानसिक मजबुती, स्थैर्य, आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव याचा पाया रुजवणं गरजेच असत. आपले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी याचा खूप महत्वाचा वाटा असतो. यावरून आपण घडतो आणि त्याची नोंद subconscious mind मध्ये होते. वडील काही मुलभूत तत्वांवर आपल्या कुटुंबाला, मुलांना आणि स्वतःच्या व्यवसायाला वाढवतात. त्या तत्वांचा व्यक्तीच्या मनावर पडलेला खंबीर प्रभाव आपल्याला डोंगराचा पाया सुरु होतो तिथून पाहता येते. आपल्याला येणाऱ्या अडथळ्यांवर आपण कशा प्रकारे मात करतो तेही डोंगरामधून समजते.

वर आणि खाली जाणारी डोंगरांची वळणे आपल्याला चित्रात दिसतात. ही वळणे व्यक्तीच्या वडिलांनी आयुष्यात किती खास्ता खाल्ल्या आहेत हे दाखवते. डोंगरांची शिखरे व्यक्तीच्या आणि तिच्या वडिलांच्या आयुष्यातले संघर्ष दाखवतात.

जे लोक डोंगर काढतच नाहीत अश्या लोकांच्या आयुष्यात स्थिरतेचा अभाव असतो.

अर्धवट डोंगर

उजवीकडे अपूर्ण डोंगर काढणाऱ्या व्यक्तीला वडिलांकडून जास्त आधाराची गरज होती जो मिळाला नाही.

डोंगरानंतर पाणी

डोंगर संपल्यावर पाण्याचा कुठलाही स्त्रोत असेल तर त्यावरून समजते कि व्यक्तीच्या कष्टांना योग्य आर्थिक मोबदला मिळाला. येणाऱ्या पुढच्या आयुष्यात चांगला आर्थिक पाठींबा बनवून ठेवला आहे.

टोकदार डोंगर

डोंगरांचे पायथे जितके टोकदार असतील तेवढी व्यक्ती सगळ्याच गोष्टींच भरपूर विश्लेषण करते. या मुळे व्यक्तीला तिच्या आयुष्यातल्या समस्या पटकन सोडवायला मदत होते. या व्यक्तीला चांगल्या गोष्टी स्वतःकडे ठेवून वाईट गोष्टी सोडून देता येतात. हा Graphology मधल्या Analytical writing शी मिळता जुळता stroke आहे. लिहिताना baseline ला angle, टोक येत असेल तर त्या व्यक्ती खूप विश्लेषण करणाऱ्या असतात. चिकित्सक वृत्ती असते.

या व्यक्ती आयुष्यात येणाऱ्या संघर्षांचे विश्लेषण करून पटकन त्यावर उपाय शोधू शकत नाहीत. या व्यक्ती खूप गोड बोलणाऱ्या आणि मायाळू असतात. भावनिक आणि व्यावहारिक असा संभ्रम आल्यावर त्यांच्या भावनांचे पारडे जड होते.

पुढे, मागे असलेले डोंगर

पुढे मागे असलेले डोंगर: अश्या चित्रकारांची दूरदृष्टी चांगली असते. यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते पण त्यांच्या असामान्य विचार करण्याच्या क्षमतेमुळे ते सर्व अडचणींवर मात करू शकतात.

डोंगरांची शिखरे टोकदार आणि दरी गोलाकार: आयुष्यात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाताना या व्यक्ती अडचणीशी संबंधित माहिती गोळा करतील पण तीचे विश्लेषण करून वापरणे यांना अवघड जाईल. उदा. घर घेताना कुठल्या area मध्ये घर घ्यायचं हे नक्की केल्यानंतर तिथल्या सगळ्या बांधकामांना भेट दिली त्यांची माहिती गोळा केई पण कुठलं घर घ्यायचे हे ठरवू शकला नाही म्हणून घर घ्यायचं राहून गेलं. या stroke ची इंग्रजी अक्षर ‘m’ शी तुलना केली जाऊ शकते.

डोंगरावर मंदिर

डोंगरावर मंदिर काढणाऱ्या व्यक्ती धार्मिक असतात. देवाला पूर्णपणे वाहून घेतलेलं असत असं म्हणता येणार नाही पण या व्यक्ती आस्तिक नक्कीच असतात.

 

पाणी:

पाणी आपल्याला feminine घटकांबद्दल सांगते. आई किंवा आईसमान व्यक्ती, स्त्रीत्वाची भावना यांच्याशी असलेले नाते हे पाण्याचे प्रतिक मानले जाते. तसेच पाणी हे पैश्याशी निगडीत असते. पाणी कुठल्या स्वरुपात काढलेले आहे? पाउस, तलाव, डबक, कारंजे, बर्फाचं तळ, ओढा, नदी, समुद्र या कुठल्याही प्रकारे पाणी दाखवता येऊ शकत. पाण्याला स्वतःचा आकार नसतो आपण ज्यात ते घालू त्याचा आकार पाणी घेते. पाणी प्रवाही असते. तसाच पैसाही प्रवाही असतो. पाणी वाहत आहे कि शांत, स्थिर आहे, पूर्ण चित्र पाण्यानी व्यापलेलं आहे का या सर्वावर आपली जडण-घडण समजते. आपण पैसे कसे वापरतो हे समजते. व्यक्तीची आर्थिक परिस्थिती लक्षात येऊ शकते.

नदी कागदाच्या डावीकडून डोंगरातून आली आणि पुढे उजवीकडे वाहात जात आहे असे जर चित्रामध्ये दिसत असेल तर असे दिसते कि कुटुंबाच्या कष्टातून पैसे आयुष्यात आले आणि ते पुढे नेहमी असणारच आहेत.

पाण्याचा स्त्रोत मधून चालू होतोय आणि मध्येच संपला आहे असे चित्र दर्शवते, व्यक्ती च्या आयुष्यात सद्य स्थितीला पैसे आहेत. आधी भूतकाळात नवते आणि पुढे असतीलच याची व्यक्तीला शाश्वती नाही.

कागदाचे ३ भाग केले असता जर पाणी तिसऱ्या भागातून उजवीकडे जात असेल तर या व्यक्तीच्या आयुष्यात पैसे येत राहतात आणि भविष्यातही येत राहतील.

आडवे पाणी

पाणी आडवे कागदाच्या वर असेल तर हे चित्र काढणारे लोक बुद्धिमत्तेचा वापर करून पैसे कमावतात. ( इथे graphology मधील zones चा reference पहावा.)

मध्ये पाणी

कागदाच्या मधल्या आडव्या पट्ट्यात पाणी असेल तर अश्या व्यक्ती सर्व पैसा आयुष्याचा आनंद घेण्यामध्ये घालवतात. यांना नवीन सिनेमा सिनेमागृहात जाऊन पाहायला आवडत असेल. वेगवेळ्या प्रकारचे नवीन हॉटेल यांना माहित असतील. बाहेर जाऊन जेवायला आवडत असेल इ.

जिथे वाहती नदी असते तिथे पैश्याच्या उलाढाली सतत चालू असतात. पण ज्या चित्रामध्ये तळ असत तिथे  ठराविक रक्कम मिळते. उदा. नोकरदार वर्गाच्या मुलांमध्ये असे चित्र दिसू शकते. तळ्यामध्ये पाणी साठलेलं असत. तिथे विहिरीसारखा झरा नसतो म्हणून असे म्हणता येऊ शकते कि तळ ही आयुष्याची  जमापुंजी. हे चित्र काढणाऱ्या व्यक्तीच्या घरी त्यानी ऐकलेलं असण्याची शक्यता आहे की, “आम्ही इतके कष्ट करून तुझ्यासाठी पैसे साठवले आहेत आता शिक्षण तरी निट घे.”

तळ्याभोवती कुंपण असेल तर त्या व्यक्तीने साठवलेली रक्कम विशिष्ठ हेतूने साठवलेली असते. ती रक्कम बाकी कशा साठी वापरायला त्याला आवडत नाही. पाण्यामध्ये दगड असतील तर  त्या व्यक्तीच्या आयुष्यात पैसे कामावण्यामध्ये बरेच अडथळे येतात.

Sea

समुद्र काढला असले तर त्या व्यक्तीकडे मुबलक प्रमाणात पैसे येण्याच्या वाटा असतात पण नक्की कुठल्या मार्गाचा वापर करावा हे व्यक्तीला समजत नाही. उदा. माझी एक मैत्रीण गाण गाते, चित्र उत्तम काढते, संतूर छान वाजवते. आता तिच्या समोर प्रश्न आहे कि career म्हणून काय निवडायचे? अश्या वेळी तिने चित्रामध्ये समुद्र काढला.

Rain

पाऊस दर्शवणारे चित्र असेल तर हे लोक नेहमीच आशावादी असतात. त्यांच्याकडे पैसे मिळण्याचा मोठा स्त्रोत आहे असे त्याचे मत असते.

विहीर

विहीर हा पाण्याचा शाश्वत स्त्रोत आहे. म्हणून विहीर चित्रात काढणाऱ्या व्यक्तीसाठी पैसे हा आयुष्यातला शाश्वत स्त्रोत आहे. विहीर काढणार्यांच्या subconscious mind मध्ये असते कि जेंव्हा गरज असेल तेंव्हा, कुठल्याही कामासाठी आपण कितीही पैसे वापरू शकतो.

 

घर:

अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. या सर्व गरजा आपल्या घरात लहानपणापासून भागवल्या जातात. म्हणून घरी आपल्याला सुरक्षितता आणि स्थिरता जाणवते. व्यक्तीच्या घर काढण्याच्या पद्धतीवरून तो मनातील सुरक्षितता आणि स्थिरता आपल्या समोर मांडतो. चित्रातील  घरात दिसणारे बारकावे व्यक्तीच्या आणि तिच्या घरातल्यांच्या सवयी, त्यांची जीवनशैली दाखवतात.

घराच्या आकारावरून समजते कि, ती व्यक्ती स्वतःला आयुष्यात किती महत्व देते.  व्यक्तीचा आत्मविश्वास घराच्या आकार वरून समजतो.

मोठे घर

घर जितके मोठे असेल तेवढा व्यक्तीचा आत्मविश्वास जास्त. त्या व्यक्तीला स्वतःसाठी वेळ द्यायला आवडते पण

लहान घर

घर लहान असेल तर त्या व्यक्तीच्या मनात बऱ्याच असुरक्षितता असतात, भीती असते. स्वतःबद्दल आत्मविश्वास कमी असतो.

घराचे दरवाजे:

घराच्या दरवाजावरून व्यक्ती बाहेरच्या जगातल्या व्यक्तींबरोबर कितपत मनमोकळी आहे हे समजते. घरात येण्याचा, व्यक्तीच्या आयुष्यात येणाचा दरवाजा हा एक मार्ग असतो.

उघडा दरवाजा

दरवाजे उघडे असतील तर व्यक्ती सगळ्यांशी मनमोकळे पणाने वागते. वेगवेगळे लोक घरात आलेले आवडतं. सगळ्यांची खातिरदारी करायला आवडतं. या व्यक्तीचे मित्र, नातेवाईक, आई-वडील, सासरची माणसं  सगळ्यांसाठी नेहमीच दर उघड असतं.

अर्धवर्तुळाकार दरवाजा

घराचा दरवाजा अर्ध-वर्तुळाकार असणारे लोक खूप प्रेमळ असतात. घरात येणाऱ्या व्यक्तींची उत्तम बडदास्त ठेवायला त्यांना छान जमत आणि आवडतही!

बंद दरवाजा

बंद दरवाजा असेल तर या व्यक्तीच्या घरात लोकांची रेलचेल नसते. अश्या व्यक्तींना घरात फार कोणी आलेलं आवडत नाही. मी भला आणि माझं काम भलं, या विचारांचे हे लोक असतात.

घराचं छत:

graphology मध्ये upper zone जसा बुद्धीशी जोडला जातो, त्याचप्रमाणे घराचे छत बुद्धीशी निगडीत आहे.

कौलारू छत

घरावरची कौले दिसत असतील तर त्या व्यक्तीकडे अनेक कल्पना असतात. त्या प्रत्यक्षात उतरवणे जमते कि नाही ते यातून दिसत नाही. पण कल्पनांचे प्रमाण जास्त असते. ही व्यक्ती बुद्धिमान, हुशार असते. या व्यक्तीचा कल बौद्धिक ठिकाणी जास्त असतो.

धुराडे: (Chimney):

धुराडे

घराला धुराडे असेल तर  त्या व्यक्तीला स्वच्छतेची सवय/ आवड आहे असे म्हणता येईल.

घराच्या खिडक्या:

नवीन कल्पना स्वीकारणे आणि त्या आत्मसात करण्यासाठी लागणारा मोकळेपणा खिडक्यांमधून दिसतो. आपल्या आयुष्यात नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी, आजूबाजूला काय चाललय हे पाहण्यासाठी आपण खिडकीचा वापर करतो. त्याचप्रमाणे अवतीभोवती येणाऱ्या नवीन कल्पना व्यक्ती मोकळेपणाने स्वीकारते कि नाही हे चित्रातील खिडक्यांवरून समजते. खुपदा नवीन कल्पना आपल्याला पटत नाहीत पण आपण मान्य करतो. ‘Agree to disagree’ यावर विश्वास ठेवून आपण कल्पना स्वीकारतो. हा मोकळेपणा आपल्याला चित्रातून दिसतो.

उघड्या खिडक्या काढल्या असतील तर व्यक्ती मनमोकळेपणाने नवीन कल्पना स्वीकारते.

खिडक्या बंद असतील तर व्यक्ती रुढीप्रिय असते. चालत आलेल्या जुन्या रूढी परंपरांवर विश्वास ठेवून तेवढेच अनुसरण करण्यावर विश्वास ठेवते. नवीन कल्पनांप्रमाणे लगेच बदलणे त्यांना आवडत नाही.

 

झाड:

झाडामधून व्यक्तीची होणारी वाढ, वृद्धी दिसते. व्यक्तीच्या मनात असलेले त्याच्या वाढ, प्रगती आणि त्याच्या आशा-आकांक्षां बद्दलचे चित्र झाडातून व्यक्त होते. स्वतःच्या प्रगतीसाठी व्यक्ती किती महत्वाकांक्षी आहे हे सुद्धा झाडाच्या चित्रातून समजते.

शैक्षणिक, व्यवसायातील तसेच नोकरीमधील प्रगती, तेथील वाढ ही झाड दर्शवते. स्वतःच्या प्रगतीकडे व्यक्ती कुठल्या दृष्टीकोनातून पाहते हे कळते. झाड विविध पैलू दाखवते. फळ, फुलं, पान, फांद्या, खोड, मुळे या सगळ्याचे वेगवेगळे अर्थ होतात. काही लोक बुंध्याशी बसायला पार काढतात तर काही झाडावर पक्षी, घरटी काढतात. हे सगळे विचारात घेऊन झाडावरून स्वभावाच विश्लेषण करावं.

झाडाचे कागदावरील स्थान:

झाड कागदावर कुठे आहे त्याप्रमाणे स्वतःची प्रगती माणूस पाहतो.

डावीकडे झाड

कागदाच्या डावीकडे झाड असेल तर व्यक्तीला वाटते कि त्याचा प्रगतीचा/ वाढीचा काळ भूतकाळात होऊन गेलेला आहे. किंवा व्यवसायाच्या बाबतीत पाहिचे झाले तर या व्यक्तीला घरचा धंदा चालवायचा असेल. आणि तोच मोठा करण्यामध्ये याला जास्त आवड असेल. त्यासाठी लागणार शिक्षण घ्यालाही ही व्यक्ती तयार असू शकते.

मध्ये झाड

झाड कागदाच्या मध्ये असेल तर सध्या आपली प्रगती चालू आहे असे व्यक्तीला वाटते. सध्या आपल्या वृद्धीचा काळ चालू आहे असे या व्यक्तीचे मत असते.

झाड उजवीकडे

झाड कागदाच्या उजवीकडे. व्यक्ती स्वतःच्या प्रगतीच्या शोधात आहे. स्वताच्या प्रगतीसाठी लागणारे शिक्षण तो भविष्यात घेणार आहे आणि त्याची वाढ येणाऱ्या काळात होईल असे याला वाटते.

एका पेक्षा जास्त झाडं काढली असतील तर व्यक्तीच्या समोर स्वतःच्या प्रगतीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत असे तिला वाटते. झाडांचे प्रमाण चित्रामध्ये जितके जास्त तेवढे व्यक्तीच्या प्रगतीचे प्रमाण जास्त.

झाडाची मूळ:

झाडाची मुळ

झाडाचा मुख्य आधार आणि झाडाला स्थिरता मिळावी म्हणून मूळ असतात. झाड जगतातच मुळांमुळे. झाडाला जगवण्यासाठी मूळ खंबीर असतात. जर एखादी व्यक्ती झाडाची मूळ चित्रात दाखवत असेल तर ती व्यक्ती खूप खंबीर असते. निग्रही असते. मुळ जितकी स्पष्ट दिसतील तेवढी व्यक्ती निग्रही आणि मुळांची स्पष्टता कमी असेल तर व्यक्तीच्या स्वतःच्या शिक्षणाच्या, व्यवसायाच्या बाबतीत अनिश्चितता वाढत जाते.

खोड:

झाडाचे खोड प्रगतीमधील स्थैर्य दाखवते. खोड मोठे असेल तर व्यक्तीचे भविष्य उज्वल असते. पण जर खोडाला कुठल्याही प्रकारचा बाक आला असेल तर त्या व्यक्ती विविध पर्याय लक्षात न घेता career निवडतात. किंवा भविष्याचा विचार करताना फारसे पर्याय विचारात न घेतल्याने त्यांची प्रगती कमी असते. झाडाखाली पार काढणाऱ्या व्यक्ती एकतर भरपूर शिकलेल्या असतात आणि शिक्षणाने त्यांच्या प्रगतीचा पाया भक्कम केलेला असतो किंवा या व्यक्ती स्वतःच्या प्रगतीसाठी दुसरे कोणी मदत करेल याची वाट पाहत निवांत असतात. हे चित्र कोण काढतंय आणि कागदावरील झाडाचे स्थान काय आहे यावर हे विश्लेषण अवलंबून असते.

फळे:

झाडाची फळे ही प्रगती पूर्ण झाल्याचे दाखवतात. झाडाला फळे असतील तर केलेल्या कष्टाचा संपूर्ण फायदा मिळावा यासाठी व्यक्ती प्रयत्न करते.

नारळाचे झाड:

नारळाच्या फांदी, खोड, फळ या सगळ्याचा आपण कशा-ना-कशासाठी वापर करतो. जर व्यक्ती नारळाचे झाड चित्रात दाखवत असेल तर ती व्यक्ती तिच्या आयुष्यातल्या सगळ्या साधनसंपत्तीचा वापर करते.

 

माणूस:

चित्रामधील माणूस ही व्यक्तीची स्वतःची ओळख असते. स्वतःबद्दलच्या व्यक्तीच्या भावना माणसाच्या चित्रामधून व्यक्त होतात. मानवी आकृती कुठे आहे, काय करताना आहे यावरून व्यक्तीला स्वतःला काय करण्याची इच्छा आहे हे समजते. मानवी आकृती काढणे तसे अवघड असते व्यक्ती स्वतःला त्या चित्रात पाहत असली तरी त्याला चित्रकलेची जोड असेल तरच व्यक्तीला इथे व्यक्त होणे सोप्पे जाते.

काटक्यांची आकृती:

असं स्वतःचं चित्र काढणारी व्यक्ती खूप साधी सरळ असते. स्वतःला गरजेपुरतेच महत्व देते. या व्यक्तीला गरज आणि इच्छा या दोन गोष्टी वेगवेगळ्या ठेवता येतात उदा. Branded वस्तू हव्यातच हा अट्टाहास नसतो पण वापरू त्या गोष्टी चांगल्या प्रतीच्या असाव्यात हे ती कटाक्षाने पाहते.

आता या हात आणि पाय दर्शवणाऱ्या काठ्या शरीराला कुठे स्पर्श करतात यावरही बऱ्याच गोष्टी कळतात.

यांत्रिक दिसणारी आकृती:

हे लोक तांत्रिक घटकांवर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे यांच्यामध्ये भावनिक ओलावा कमी असतो. भावना व्यक्त करताना हे खूप विचार करतात. यंत्रांवर जास्त विश्वास असतो.

संपूर्ण मानवाकृती असेल आणि चेहऱ्यावरच्या भावनाही दिसत असतील तर व्यक्ती भावनाप्रधान असते. व्यक्त करायला आवडते आणि चांगल्या प्रकारे जमते. भावना जश्या चित्रात दिसत असतील तसं ती व्यक्ती अनुभवते. राग, दुखः, हसरा चेहरा या भावना चित्रातून दिसू शकतात.

कपडे कुठल्या प्रकारचे आहेत त्यावरून व्यक्तीचा दृष्टीकोन कळतो. औपचारिक आणि अनौपचारिक कपड्यांवरून व्यक्ती समोरच्याशी कशी वागत असेल ते कळते.

पायात चप्पल/ बूट असतील तर ही व्यक्ती सतत फिरण्यासाठी तयार असते. हे लोक सतत काम करायला तयार असतात.

चित्रामध्ये एकापेक्षा जास्त मानवी आकृत्या असतील तर ती व्यक्ती इतरांमध्ये मिसळते.

चित्रामध्ये कुटुंब दाखवलेले असेल तर व्यक्ती कुटुंबाला आणि परंपरेला जास्त मान देते.

चित्रात दिसणाऱ्या बाकीच्या गोष्टी:

ढग:

चित्रामध्ये ढग असतील तर व्यक्तीच्या मनात चुकीच्या कल्पना किंवा चुकीच्या भीती बसलेल्या असतात.

विविध प्राणी:

चित्रामध्ये प्राणी असतील तर व्यक्ती प्रेमळ असते.

गाडी:

गाडी दाखवली असेल तर व्यक्तीच्या आयुष्यातली गती समजते. गाडी डावीकडे, उजवीकडे काढलेली असेल तर त्यावरून व्यक्तीच्या आयुष्यातील गती कुठे होती हे लक्षात येते.

इंद्रधनुष्य:

व्यक्तीला मौजमजा करायला आवडते.

चित्रामध्ये हे आणि असे अनेक घटक दिसतात. ज्या प्रकारे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी असते तसेच प्रत्येक व्यक्तीचे चित्र वेगळे असते. व्यक्तीला कुठल्या प्रकारे वाढवलं आहे, तिच्या समोर कोणते आदर्श आहेत, व्यक्तीच्या आई वडिलांची वैचारिक पद्धत कशी आहे, त्या वैचारिक पद्धतीचा चित्रकारावर पडलेला प्रभाव, चित्रकाराने आदर्श मानून अनुसरण केलेल्या व्यक्तींचा त्याच्या स्वभावावर झालेला प्रभाव, आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची ताकद, इच्छाशक्ती आणि त्यावर केलेलं काम हे सर्व घटक चित्रातून समजतात. graphology आणि psychology च्या आधारे आपण याचे विश्लेषण करू शकतो. वरील विश्लेषण माझ्या अनुभवावरून, श्री मिलिंद राजोरे यांच्या Decode Drawings या पुस्तकाच्या आधारे तसेच काही लेखांच्या आधारे लिहिलेले आहे. त्या लेखांच्या links:

Reference links:

1. https://terrynorton-wrightblog.com/2015/03/01/drawing-analysis/

2. http://onejive.com/draw-tree-find/

3.http://www.creativecounseling101.com/art-therapy-house-tree-sun-water-animal-drawing.html

 

या लेखात मी मर्यादित माहिती लिहिलेली आहे. चित्रावरून स्वभाव समजून घेण्यामध्ये काही प्रश्न, शंका असल्यास नक्की विचारा. उत्तरं द्यायला, तुमच्या शंकाचे निरसन करायला मला नक्कीच आवडेल.

भाग्यश्री वारके.

८८०६२२२७७९

This Post Has 13 Comments

 1. Quite helpful …thanks for sharing

  1. Always There To Help You 🙂

 2. Nice & Informative

  1. Thank you..!!

 3. Very imp information bhagyeshree it’s very useful for us great going on keep it up

  1. Keep reading.. keep sharing

 4. Nice

 5. खूप छान

  1. Thank You

 6. Simplified with details.
  Grateful:)

  1. Thank you 🙂

 7. Very informative and simplified

  1. Thanks for reading.. It is a brief article

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu