हस्ताक्षरावरून व्यक्तिमत्वाची ओळख

हा लेख graphology awareness साठी लिहिलेला आहे. हा आणि असे बरेच लेख इथून पुढे प्रत्येक महिन्याला लिहिण्याचा मी प्रयत्न करीन. चिकित्सक वृत्तीने वाचलं तर प्रत्येकाला यातून स्वतःसाठी महत्वाच काहीतरी मिळेलच. प्रयत्न करून पाहा! आणि हो feedback ची वाट पाहतीये…

तुम्ही हे वाचताय, आणि तुम्ही रोबोट नाहीए, म्हणजेच तुम्ही कधी ना कधी लिहायला शिकला आहात! लिहिताना तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का ? एकत्रच, एकसारखं, एकाच वर्गात शिकूनही प्रत्येकाचं अक्षर इतकं वेगळं कसं असतं? कसं काय काही लोकं खूप वळणदार लिहितात तर, काही अगदी मुंगी कागदावरून चालत गेल्या सारखं??!!! काही अगदी सुवाच्य तर, काही खूपच गचाळ, न वाचता येण्या सारखं? तुमच्या या आणि अश्या अनेक प्रश्नांची गुपितं सोडवण्यासाठी ग्राफोलॉजी हि एक किल्ली आहे. ग्राफोलॉजी (graphology) मध्ये हस्ताक्षरावरून व्यक्तिमत्वाचे, स्वभावाचे परीक्षण केले जाते! तुमच्या अक्षरातून कळणाऱ्या गमती-जमती, काही तुमच्या स्वभावातील गुण दोष जे तुम्हालाही उलगडले नसतील, स्वभाव वैशिष्ठ्ये, तुमचे पैलू तसंच तुम्ही काम वेळेवर करता की पुढे ढकलता या सारख्या अनेक गोष्टी अक्षरातून समजतात! विश्वास ठेवायला अवघड जात असला तरी हे अगदी १००% खरं आहे. हस्ताक्षरावरून व्यक्तिमत्व समजून घेण्याच्या या शास्त्राला ग्राफोलोजी (graphology) असे म्हणतात. थोडक्यात माणसाचा स्वभाव आजकाल आपल्याला हस्ताक्षरावरून कळतो! ‘काय आजची पिढी हे नवनवीन शोधून काढून त्यात career करते कोणास ठाऊक?’ अस वाटणाऱ्यांसाठी एक सांगणं आहे, अहो आहात कुठे? हे ४०० वर्ष जुनं शास्त्र आहे! आत्ता कुठे भारताला त्याची जराशी ओळख व्हायला लागलीये. लेखणीतल्या शाईच्या प्रवाहातून कागदावर उमटणाऱ्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणारे आम्ही अभ्यासक! हे शास्त्र अगदी कोणालाही शिकता येते, यासाठी वयोमर्यादा नाही.

हस्ताक्षर परीक्षण (Handwriting Analysis) म्हणजे अक्षरावरून, शास्त्रीय पद्धतीने व्यक्तिमत्वातले गुण-दोष ओळखणे, त्याचे मूल्यमापन करणे व व्यक्तीला समजून घेणे होय. समोरील गंभीर प्रसंगी तुमचे भावनिक प्रतिसाद, एकाग्रता, विचार करण्याची पद्धत, आत्मसन्मान, आत्मविश्वास, स्वसंरक्षणासाठीच्या पद्धती, भीती, करारीपणा, स्वावलंबी आहात की परावलंबी, संवाद कौशल्य, कामातील सातत्य, व्यक्तिमत्वातील अद्वितीय वैशिष्ठ्य या सारख्या अनेक गोष्टी फक्त अक्षराकडे पाहून कळतात!

ग्राफोलोजी (Handwriting Analysis)) म्हणजे काय समजल्यावर साहजिकच मनात प्रश्न निर्माण होतो ह्याचा मला काय उपयोग? तर हे सर्व वयोगटांसाठी उपयुक्त आहे! जसे व्यवस्थापकांना त्यांच्या कार्यक्रमामध्ये मनोरंजन म्हणून, नवीन व्यवसाय चालू करताना आपला भागीदार योग्य आहे का? हे समजून घेण्यासाठी, नोकरीसाठी भरती करताना त्या जागी योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी, पोलिसांना मदत, कागदपत्रांच्या परीक्षणासाठी, कोर्टमध्ये न्यायनिवडा करण्यासाठी, समुपदेशकांना समोरील व्यक्तीला त्याच्या नकळत समजून घेण्यासाठी, तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे व्यक्तिमत्व विकासासाठी याचा वापर होतो. लहान मुलांसाठी अभ्यासाबरोबरच जीवनावश्यक कौशल्ये आणि व्यक्तिमत्व विकसित होणे हे सध्याच्या जीवनात अत्यावश्यक आहे. त्यासाठी ग्राफोलॉजी चा उत्तम वापर होतो. लहान मुलेच कशाला, मोठ्या लोकांनाही सुधारणेची गरज असतेच की! म्हणतात ना Its never too late.

अक्षरात बदल घडवून आणल्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये सुधारणा करण्याचा एक सोप्पा उपाय शोधला आहे ग्राफोलॉजीस्टनी (grphologist). जुनी म्हण होती स्वभावाला औषध नाही पण खरंतर बदलायची मनापासून इच्छा असणाऱ्यांसाठी ‘स्वभावाला औषध आहे!!’ ग्राफो-थेरपीमुळे (अक्षरामधील काही वळणे (strokes) बदलल्यामुळे) स्वभावात बदल होतो, अनेक भीती कमी होतात, आत्मविश्वास वाढतो, ध्येय ठरवून त्या पर्यंत पोहोचण्याची योग्य दिशा गवसते, संवाद कौशल्य सुधारतात, समजून घेण्याची तसेच जबाबदारी पेलण्याची क्षमता वाढते, चिडचिड कमी होते, एखाद्या घटनेला कुशलपणे हाताळता येते, नातेसंभंध सुधारतात, व्यक्ती गरज असेल तिथे पुढाकार घेते, इतकेच काय अगदी विविध आज़ार बरे करायलाही मदत होते. ग्राफो-थेरपीमुळे बुजरेपणा कमी होऊन योग्य ठिकाणी योग्य वेळीं आपण स्वतःला व्यक्त करायला शिकतो. या सारखे अनेक फायदे झालेले मी गेली अनेक वर्षे पाहतीये. मी स्वतः निराशेनी ग्रासलेल्या लोकांना परत सकारात्मक विचार करताना पाहिलंय. १२ वी मध्ये बोर्डात, प्रिलिम्स पेक्षा २७% गुणांमध्ये वाढ झालेली पाहिली आहे. २ भिन्न व्यक्तीमत्वच्या व्यक्ती एकमेकांना अनुरूप आहेत कि नाही हे अक्षरावरून कळाले आहे!

ग्राफो-थेरपीमुळे (Grapho-therepy) उत्तम व्यक्तिमत्व विकसीत झालेले अनेकजण आज या समाजात वावरत आहेत. स्वतःला प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर सुधारणे खरंच सोप्पे आहे फक्त मनाची तयारी हवी! तुमच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी संधी तुमचा दरवाजा ठोठावत आहे. स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या या नव्या पायवाटेवर चालण्याचा प्रयत्न करून बघा तुम्ही आयुष्यात अनेक नवीन यशशिखारे गाठू शकाल !

This Post Has One Comment

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu